अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मागितली लाच; ४ हजार घेताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले, एसीबीच्या पथकाची मलकापुतरात कारवाई...

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या मळणीयंत्राच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडे ५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४ हजार रुपये स्वीकारणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक ईश्वर भागवत सावकारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ फेब्रुवारी रोजी रंगेहात पकडले.
तक्रारदार शेतकऱ्याने कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने मळणीयंत्र खरेदी केले होते. संबंधित अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे (रा. शिरपूर कन्हाळा रोड, तुकाराम नगर, भुसावळ, जि. जळगाव) यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा येथे तक्रार दाखल केली.
६ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या मागणी पडताळणीदरम्यान सावकारे यांनी तडजोडीअंती ४ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी मलकापूर–बोदवड रोडवरील पिंपळगावदेवी फाटा, राधास्वामी सत्संगजवळ सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावकारे यांना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी ईश्वर भागवत सावकारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा येथील पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे तसेच सापळा पथकातील कर्मचाऱ्यांनी पार पाडली.