BREAKING खळबळजनक! ‘राजीनामा दे, नाहीतर संपवून टाकीन’… सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून लोकनियुक्त

सरपंचांची आत्महत्या; संग्रामपूर तालुक्यात राजकीय संघर्षाने घेतला टोकाचा वळण!करमोडा गावातील धक्कादायक घटना; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत राजकीय विरोधकांवर गंभीर आरोप, खासदार जाधव आणि आमदार कुटेंचे नाव घेऊन म्हणाले....

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात आज, ११ ऑगस्ट रोजी सकाळी समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. राजकीय विरोध आणि सरपंचपदावरून सुरू असलेल्या कथित दबावाला कंटाळून करमोडा येथील लोकनियुक्त सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यामध्ये राजकीय विरोधकांकडून त्रास आणि धमकावल्याचा गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दीपक प्रकाश उगले यांनी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ; राजकीय विरोधकावर गंभीर आरोप

आत्महत्या करण्यापूर्वी दीपक उगले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी राजकीय विरोधातून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे.

व्हिडिओमध्ये त्यांनी, “याच्या त्रासाला कंटाळून मी माझे आयुष्य संपवत आहे...” असे म्हणत सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचे सांगितले आहे. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राजीनामा देण्यासाठी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

व्हिडिओमध्ये त्यांनी संबंधित व्यक्तीकडून आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धमकी दिल्याचा दावा केला असून, “लवकरात लवकर तू राजीनामा दे,” असा दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे.

या व्हिडिओमध्ये दीपक उगले यांनी एका राजकीय विरोधकाचे नाव घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, व्हिडिओतील आरोपांची सत्यता आणि त्यामागील नेमकी वस्तुस्थिती अद्याप तपासातून स्पष्ट झालेली नाही.

सरपंचपदासाठीच हा दबाव होता?

दीपक उगले हे करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यांच्या आत्महत्येमागे सरपंचपदावरून निर्माण झालेला राजकीय संघर्ष आणि कथित दबाव कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या व्हिडिओमुळे या घटनेला गंभीर राजकीय वळण मिळाले आहे. गावपातळीवरील राजकारण किती टोकाला जाऊ शकते, याचे विदारक चित्र या घटनेतून समोर आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

खासदार जाधव आणि आमदार कुटेंचे नाव घेऊन म्हणाले....

दरम्यान सरपंच दिपक उगले यांनी व्हॉटस्अप स्टेट्सवर व्हिडिओ ठेवला. "माझा हा व्हिडिओ स्टेटसला बघितल्यानंतर संग्रामपूर पोलिस ठाण्यात लवकरात लवकर संपर्क साधून आरोपीला अटक करून माझा अंत्यविधी शांततेत पार पडावा,इतकंच माझं म्हणणं. आहे,जास्तीत जास्त लोकांनी माझ्या अंत्यविधीला हजर रहावे" असे दिपक उगले यांनी व्हिडिओत म्हटले आहे. याशिवाय त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे यांनाही आवाहन केले आहे. " त्याला फासावर लटकवण्यासाठी पूर्ण पत्रकार संघटना आणि खासदार प्रतापराव जाधव,आमदार संजय कुटे या सर्वांनी पुढाकार घेऊन त्याला फासावर लटकवण्याचे काम करावे,हीच माझी सर्वांना नम्र विनंती.. हा बाहेर येता कामा नये" असे व्हिडिओत म्हटले आहे...

तामगाव पोलिसांकडून पंचनामा; पुढील तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर दीपक उगले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरवट बकाल येथे नेण्यात आला.

आत्महत्येपूर्वीचा सोशल मीडिया व्हिडिओ, त्यातील आरोप, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि दीपक उगले यांच्यावर नेमका कोणत्या प्रकारचा दबाव होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्यासंदर्भात कोणावर गुन्हा दाखल झाला आहे का, याबाबतची अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या पुढील तपासातून या धक्कादायक घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येण्याची शक्यता आहे.