BREAKING खळबळजनक! लोणार मध्ये नकली नोटांचे मोठे रॅकेट! ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात; दहशतवाद विरोधी पथकाकडून आरोपींची कसून चौकशी! देश विघातक कृत्यात सहभाग तर नाही ना?

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार मध्ये नकली नोटांचे मोठे रॅकेट समोर आले आहे. लोणार पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी प्राध्यापक देखील आहे. आरोपी लोणार आणि सुलतानपूर येथील राहणारे असून यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.. त्या दृष्टीने पोलिसांनी या प्रकरणात कमालीची गोपनीयता बाळगली आहे. काल दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) देखील लोणार मध्ये दाखल झाले होते. त्यांनी देखील आरोपींची कसून चौकशी केली आहे. या आरोपींचे हैदराबादसह पाकिस्तान कनेक्शन तर नाही ना? किंवा कुठल्या देश विघातक कृत्यांमध्ये हे आरोपी सहभागी आहेत का? या दृष्टीने दहशतवाद विरोधी पथकाने आरोपींची चौकशी केलेली आहे..मात्र या चौकशीतून काय समोर आले हे अद्याप कळू शकले नाही.. 
   विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यात एक व्यक्ती भारतीय स्टेट बँकेत पैसे भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो व्यक्ती भरत असलेल्या नोटा नकली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर बँक प्रशासनाने याबद्दलची माहिती पोलीस प्रशासनाला दिली होती. यानंतर एक एक करत आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा प्राध्यापक देखील असून स्वतःला तो संपादक,पत्रकार देखील म्हणवून घेतो. आरोपी लोणार आणि सुलतानपूर असल्याचे सूत्रांनी सांगितले, मात्र आरोपी बद्दल कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे, कारण यात आणखी मोठे मासे गळाला लागतात का ? या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाचा दुजोरा दिलेला असला तरी तपासाच्या कारणास्तव अधिक बोलण्यास नकार दिला..
काल या प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने देखील आरोपींची चौकशी केली. नकली नोटांच्या माध्यमातून आरोपींचा देश विघातक कृत्यांमध्ये सहभाग आहे का? नकली नोटा कुठून आल्या याबद्दल दहशतवाद विरोधी पथकाने चौकशी केली आहे..दरम्यान या प्रकारामुळे लोणार मध्ये सध्या एकच खळबळ उडाली आहे..