

BREAKING चिखलीत आयपीएल सट्टेबाजांना दणका! LCB ची धमाकेदार कारवाई! दोघे अटकेत, दोघे फरार! सीएसके विरुद्ध हैदराबाद सामन्यावर सुरू होता सट्टा...
Apr 26, 2025, 10:52 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या आयपीएलचे सामने जोमात सुरू आहेत.. हळूहळू आयपीएलचा प्रवास आता प्ले ऑफ सामन्यांकडे सुरू झाला आहे. अशातच सट्टेबाजीला सुद्धा वेग आला आहे. सट्टेबाजांना कुठलेही परिस्थितीत सोडू नका असे स्पष्ट आदेशच एसपी विश्व पानसरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर LCB प्रमुख अशोक लांडेंच्या नेतृत्वात चिखली पोलिस स्टेशनच्या हद्दीत सट्टेबाजांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. २ सट्टेबाजांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. काल,२५ एप्रिलच्या रात्री चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे चिखली पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर सट्टेबाज सट्टा लावत होते..
चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोघे आरोपी फिरता फिरता सट्टा लावत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या नेतृत्वातील पथक सट्टेबाजांच्या मागावर होते. गांधी नगरात दोन सट्टेबाज त्यांच्या बुलेट वाहनावर फिरत सट्टेबाजी करत असल्याचे पथकाला दिसल्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मोहिज खान आत्ता मोहम्मद खान आणि अंकुश राजेंद्र कायस्थ (दोघे रा.चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील आरोपी अमोल देशमुख आणि देवा धंदर या मोठ्या सटोड्यांच्या संपर्कात होते अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. अमोल देशमुख आणि देवा धंदर फरार आहेत. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी रोख १५ हजार ७००, दोन मोबाईल, मोबाईल मधील काही स्क्रीन शॉट, चिठ्ठ्या आणि बुलेट असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजकुमार राजपूत, गजानन दराडे, शरद गिरी, विनिता शिंगणे, वैभव मगर, ऋषिकेश थूट्टे , ऋषिकेश खंडेराव, समाधान टेकाळे यांनी केली.