BREAKING भीषण अपघात; रस्ता क्रॉस करतांना भरधाव कारने शेतकऱ्याला चिरडले; तांदूळवाडीतील वाणी मळ्याजवळ झाला अपघात

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धाड रोडवरील तांदूळवाडीत आज,२५ मार्चला दुपारी दीड वाजता भीषण अपघात झाला. रस्ता क्रॉस करणाऱ्या शेतकऱ्याला भरधाव वाहनाने चिरडले. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बळीराम पांडुरंग वाणी (५६, रा.तांदुळवाडी) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
  प्राप्त माहितीनुसार आज दुपारी एक–दीड वाजेच्या सुमारास बळीराम वाणी हे रस्ता ओलांडत होते. यावेळी आलेल्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे. बळीराम वाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
आतापर्यंत गेलाय अनेकांचा जीव...
 बुलढाणा धाड रस्त्यावरील तांदूळवाडी फाट्याजवळ आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यात अनेकांचा जीव गेला आहे. तांदुळवाडी फाट्यावर लोक वस्ती वाढली आहे. या रस्त्यावर वाहने अगदी सुसाट वेगाने धावतात. ग्रामस्थांना रस्ता क्रॉस करणे ही कठीण होते..त्यामुळे रस्त्यावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे..