महिना-दीड महिन्यापासून पोलिसांच्या रडारवर होते ‘ते’ दोघे! शेतातील घरात घुसून जबरी चोरी अन् महिलेवरील अत्याचाराने मलकापूर हादरले होते;
१७ जुलैच्या रात्री ग्राम दुयाळगाव शिवारातील शेतातील घरात ही धक्कादायक घटना घडली होती. रात्री सुमारे ११ वाजता दोन अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पतीला चाकूचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल आणि रोख रक्कम लुटली. त्यानंतर महिला आणि तिच्या पतीला शेतात नेण्यात आले. तेथे पतीला विळ्याचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या घटनेनंतर १८ जुलै रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
घटनेनंतर आरोपींची ओळखच पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपींचा शोध घेण्यासाठी तब्बल पाच पथके तयार केली. आरोपींचा मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला.
स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. साक्षीदारांकडून माहिती घेण्यात आली. संशयितांची माहिती संकलित करण्यात आली. त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण आणि डीएनए नमुन्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. एक-दोन दिवस नव्हे, तर तब्बल महिना-दीड महिना आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची तपासाची चक्रे सुरू होती. अखेर या सातत्यपूर्ण तपासातून पोलिसांना दोन्ही आरोपींची ओळख पटवण्यात यश आले.
राकेश महेंद्रसिंग भिल्लाला (२२) आणि जामसिंग रेशन भिल्लाला (२२), दोघेही रा. जामठी, ता. जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी मध्य प्रदेशात असल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम दापोरा (शहापूर), जिल्हा बुरहानपूर येथे कारवाई केली. २६ ऑगस्टच्या रात्री सुमारे १ वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून फिर्यादीच्या पतीचा चोरीस गेलेला मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपी सापडेपर्यंत तपासाची कास सोडली नाही!
या प्रकरणात सुरुवातीला आरोपींची कोणतीही स्पष्ट ओळख समोर नसताना पोलिसांनी विविध तांत्रिक आणि पारंपरिक तपास पद्धतींचा वापर केला. सीसीटीव्ही, साक्षीदार, तांत्रिक विश्लेषण आणि डीएनए अशा वेगवेगळ्या धाग्यांची सांगड घालत अखेर आरोपींपर्यंत पोहोचण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. त्यामुळे गंभीर आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास लावल्याबद्दल पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक खामगाव सोहन माछरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, पोउपनि. प्रताप बाजड, अविनाश जायभाये, पोहेकॉ. विजय पैठणे, युवराज राठोड, शेख चाँद, गणेश पाटील, पोकॉ. निलेश राजपूत, अमोल वनारे, अमोल इंगळे, विक्की इंगळे, चापोकॉ. शिवानंद हेलगे, निवृत्ती पुंड, पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषीकेश खंडेराव आणि कैलास ठोंबरे यांच्या पथकाने केली.