चारित्र्याच्या संशयाने रक्तरंजित थरार!; झोपेत असलेल्या पत्नी व चार वर्षीय चिमुकल्याचा कुऱ्हाडीने निर्घृण खून:मेहकरच्या शिक्षक कॉलनीतील हादरवून टाकणारी घटना...
Updated: Dec 29, 2025, 17:26 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच आपल्या झोपेत असलेल्या पत्नीचा आणि अवघ्या चार वर्षीय चिमुकल्या मुलाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची अंगावर शहारे आणणारी घटना मेहकर येथील शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक १ मध्ये रविवारी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण मेहकर शहर हादरून गेले असून, परिसरात भीती व हळहळ पसरली आहे.या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के (वय ४) यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के (वय ३५) असे आहे.दरम्यान मेहकर पोलिसांनी आरोपी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
राहुल म्हस्के, त्याची पत्नी रूपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंद म्हस्के, आई ताराबाई हरी म्हस्के व आजी — असे एकूण सहा जण शिक्षक कॉलनीतील घरात वास्तव्यास होते. रविवारी रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुल म्हस्केने अचानक घरात ठेवलेली कुराड उचलली आणि झोपेत असलेल्या पत्नी रूपाली व मुलगा रियांश यांच्या डोक्यावर सपासप वार केले.
घरातून येणाऱ्या हालचाली व आवाजामुळे राहुलची आई ताराबाई मस्के यांना संशय आला. त्यांनी बाहेर येताच घरातील भयावह दृश्य त्यांच्या नजरेस पडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सून व नातवंड पाहून त्यांनी आरडाओरडा केला.
घटनेची माहिती मिळताच घरासमोरील संजय समाधान कळसकर यांच्यासह इतर शेजाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी अवस्थेतील रूपाली यांना त्यांनी तत्काळ मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपी राहुल म्हस्के याने स्वतःला आणि चार वर्षीय रियांशला घरातील आतील खोलीत बंद करून घेतले होते. संशय आल्याने शेजाऱ्यांनी अनेक वेळा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर राहुलने आतून दरवाजा उघडला. त्यानंतर आत पाहणी केली असता रियांशही गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.जखमी रियांशला राहुल चावरे व सुमित कासतोडे यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी रियांशला मृत घोषित केले.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल
घटनेची माहिती मिळताच मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, तसेच पोलीस अधिकारी संदीप बिराजे, अवचार, नरवाडे, खाडे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.पोलीसांनी आरोपी राहुल मस्के यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण, संशयाची पार्श्वभूमी व मानसिक स्थिती याबाबत चौकशी करण्यात येत आहे.
चिमुकल्याचा मृत्यू पाहून शहर हळहळले
चार वर्षांचा निष्पाप रियांश या कौटुंबिक वादाचा बळी ठरल्याने नागरिकांच्या भावना हेलावून गेल्या आहेत. वाद मिटवण्याऐवजी रक्त सांडले, अशी प्रतिक्रिया परिसरात उमटत असून, घरगुती संशय व मानसिक अस्थैर्य किती भयावह परिणाम घडवू शकते, याचे हे भीषण उदाहरण ठरले आहे.
