शेगावात रक्तरंजित थरार! आधी गावठी कट्टा बाहेर, मग कुऱ्हाडीचे सपासप वार; दोन युवक गंभीर...

 
 शेगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील एमएसईबी चौक परिसर रविवारी (२६ जुलै) सायंकाळी अक्षरशः रणांगणात बदलला. जुन्या आपसी वादातून सुरू झालेल्या हाणामारीने काही क्षणांतच हिंसक वळण घेतले. गावठी कट्टा बाहेर काढल्याचा आरोप होताच संतप्त झालेल्या दोन जणांनी कुऱ्हाडीने सपासप वार केल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुटराव गुलाबराव बेले आणि युवराज मुकुटराव बेले (रा. दसरा नगर) यांचा पवन लांजुळकर व शिवाजी तांदळे (रा. अळसना) यांच्याशी जुना वाद होता. रविवारी सायंकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.

प्राथमिक माहितीनुसार, या वादादरम्यान पवन लांजुळकर याने गावठी कट्टा बाहेर काढल्याचा आरोप आहे. यानंतर वातावरण आणखी तापले आणि संतप्त झालेल्या आरोपींनी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात पवन लांजुळकर आणि शिवाजी तांदळे यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. दोघांनाही तातडीने सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निमेश मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची तपासणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले.

दरम्यान, या प्रकरणात वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शेगाव शहर पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे. विशेष म्हणजे, प्राथमिक माहितीनुसार जखमी पवन लांजुळकर याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, त्याबाबतही स्वतंत्र गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.