यात्रेत दुकान लावण्यावरून रक्तरंजित हाणामारी; एकाचा हात फ्रॅक्चर, बाप-लेकांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
जवळा बाजार (ता. नांदुरा) येथील रहिवासी प्रल्हाद रामकृष्ण इंगळे (वय ३८) हे २४ जानेवारी २०२६ रोजी इलोरा चावरा येथील यात्रेत दुकान लावण्यासाठी गेले होते. सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास दुकान लावण्याच्या जागेवरून आरोपी शरद रामदास बावणे याने त्यांच्याशी वाद घातला. शाब्दिक वादाचे रूपांतर शिवीगाळ व त्यानंतर मारहाणीत झाले.
या वेळी शरद बावणे याने प्रल्हाद इंगळे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद मिटवण्यासाठी प्रल्हाद यांचे काका भागवत पंजाजी इंगळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, चवताळलेल्या आरोपी पवन रामदास बावणे याने त्यांच्यावर काठीने थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात भागवत इंगळे यांचा हात फॅक्चर झाला.
याच वेळी आरोपी रामदास बावणे यानेही फिर्यादी व त्यांच्या काकांना चापट-बुक्क्यांनी मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. तसेच पुन्हा यात्रेत दिसल्यास किंवा दुकान लावल्यास जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काकांचा आक्रोश ऐकून गजानन इंगळे व शत्रुघ्न इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांची सुटका केली. मात्र त्यानंतरही आरोपींनी पुन्हा यात्रेत आल्यास हात-पाय तोडून जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी प्रल्हाद इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आरोपी रामदास बावणे, शरद बावणे व पवन बावणे (सर्व रा. अकोला खुर्द) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ११८ (२), ३५१ (३), ३५२ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार भागवत उबरहंडे करीत आहेत.
