नांदुऱ्यात रक्तपात! इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवली म्हणून मुलीच्या भावाने तरुणाला बेदम ठोकले;डोक्यात दगड घातला...

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : इन्स्टाग्राम वर स्टोरी ठेवल्याच्या कारणावरून नांदुऱ्यात मोठा रक्तपात झाला. तरुणाच्या डोक्यात दगड घालण्यात आला, या प्रकारात मोठा रक्तस्त्राव झाल्याने तरुण गंभीर जखमी झालाय.. प्रेम प्रकरणातून हे कांड घडल्याचे समोर आले आहे.. एका तरुणाने इंस्टाग्राम वर स्टेटस ठेवले, ते स्टेटस आपल्या बहिणीशी संबंधित असल्याचे आरोपीला वाटल्याने आरोपीने साथीदारांसह तरुणाला गाठून त्याला बेदम चोप दिला.. विशेष म्हणजे ही घटना तरुणाच्या वडिलांच्या डोळ्यादेखत घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुरा येथील नालंदा नगर भागात राहणारा २२ वर्षीय ऋतिक संजय बिराडे याचे आरोपी सक्षम याच्या बहिणीसोबत गेल्या पाच महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, त्यांच्यातील प्रेमसंबंध संपुष्टात आले असले तरी याबाबत आरोपीच्या मनात राग आणि द्वेष धगधगत होता, त्याचा स्फोट १५ एप्रिलच्या दुपारी ३.३० च्या सुमारास झाला. ऋतिक नेहमीप्रमाणे कपड्याच्या दुकानावर काम करित असताना आरोपी सक्षम याने फोन करून ऋतिकला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच इन्स्टाग्रामवर स्टोरी का ठेवली, म्हणून जाब त्याने विचारला. त्यावर ऋतिकने ती माझी वैयक्तिक स्टोरी असल्याचे सांगतल्यावरून सक्षमने त्याला प्रत्यक्ष भेटायला बोलावले. हा

वाद विकोपाला जाऊ नये म्हणून ऋतिकचे वडील संजय बिराडे यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. बाप-लेक दोघेही डॉ. मानकर हॉस्पिटलसमोरील संचेती ले-आऊट भागात पोहोचले. यावेळी ऋतिकचे वडील अतिशय संयमाने सक्षमची समजूत काढत असताना आरोपी सक्षमने रागाच्या भरात जमिनीवर पडलेला एक मोठा दगड उचलून ऋतिकच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे ऋतिकच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. यावेळी त्यांच्या डाव्या खांद्यावर आणि डाव्या हातावरही दगडाने मारहाण करण्यात आली. तसेच आरोपी रणवीर वानखडे आणि त्याचे इतर दोन मित्रांनी ऋतिकची गचांडी पकडून ठेवली. तर सक्षमने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी ऋतिक बिराडे याने नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सय्यद मोहिद्दीन हे करीत आहेत.