EXCLUSIVE बुलडाणा जिल्ह्यात रक्तपिपासू वाढले..३१ मर्डर; "त्या" दोघींच्या खुनाचे आरोपी अद्यापही मोकाट! ३७ जणांचा गेम होता होता वाचला....! नेमकं मॅटर काय? वाचा....

 

बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय...बुलडाणा जिल्ह्यात आता माणसाचं रक्त पिण्याची स्पर्धा लागली की काय? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याला कारणही तसेच आहे.जिल्ह्यात आता गल्लोगल्ली भाई, डॉन यांची संख्या वाढत आहे..गंभीर गुन्हे करायलाच आपला जन्म झालाय असं या भाईगिरी करणाऱ्यांना वाटतं..जिल्ह्यात गत आठ महिन्यांत क्राईम रिपोर्ट बुलडाणा लाइव्ह ला प्राप्त झाला असून तो चिंताजनक असाच आहे. गेल्या ८ महिन्यांत जिल्ह्यात ३१ खुनाच्या घटना घडल्या आहेत, त्यापैकी २९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  बुलडाणा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या अधिकृत महितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत ३१ मर्डर झाले आहेत. तशी नोंद संबधित पोलीस ठाण्यात आहे. या ३१ पैकी २९ घटनांचा तपास पोलिसांनी केला आहे. मात्र २ गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात संबधित पोलीस स्टेशन आणि LCB ला अपयश आले आहे.
     ही आहेत कारणे..
गुन्हेगारी वाढण्याची विविध कारणे आहेत. त्यातही खून करण्याचा टोकाचा निर्णय घेण्यामागे विविध कारणांची उकल पोलिसांनी केली. त्यात सर्वाधिक मर्डर हे अनैतिक संबंधातून होत असल्याचा निष्कर्ष आहे. बायकोचं बाहेरच्याशी लफड म्हणून बायकोचा खून, अनैतिक संबंधात नवऱ्याचा अडसर म्हणून प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून, प्रेमात धोका म्हणून जुन्या प्रेयसीचा खून अशी विविध कारणे समोर आली आहेत. शिवाय पैशांचा विषय, शेतजमिनीचा वादाचा विषय यातून देखील खुनाच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
त्या दोघींना न्याय कधी मिळणार...?
 जिल्ह्यात २३ जानेवारीला अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील असोला शिवारात एका विवाहितेचा खून झाला होता. अंदाजे २० -२२ वर्षे वय असलेल्या विवाहितेचा मृतदेह नग्नावस्थेत व अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तिच्यावर आधी बलात्कार करून नंतर डोक्यात महिला बाजूला दगडाचा वार करण्यात आला , गळा आवळून खून केल्यावर तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. घटनास्थळी तूप आणि दिव्याची वात सापडली होती त्यामुळे या घटनेबाबत तर्कवितर्क करण्यात येत होते. 
  पोलिसांनी त्या विवाहित तरुणीची ओळख पटविण्यासाठी खूप आटापिटा केला. राज्यभरात दाखल झालेल्या मिसींग तक्रारी, त्याचा डेटा जमा करून शेकडो कुटुंबाशी संपर्क साधला मात्र एवढे करूनही त्या मृत तरुणीची ओळख पटली नाही. त्यामुळे गेल्या ८ महिन्यांत पोलिसांना या खुनाचा उलगडा करता आलेला नाही.
  दुसरी घटना किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. या घटनेत असोला हत्याकांडासारखी पद्धत वापरली होती. ३० मे रोजी पिंपळगाव लेंडी शिवारात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता, महिलेचे वय अंदाजे २५ वर्षे होते. या घटनेत मारेकऱ्यांनी आधी महिलेचा गळा चिरून खून केला, पायाला ६ बोटे असल्याने ती कापली आणि नंतर मृतदेह पिंपळगाव लेंडी शिवारातील गायके ढाब्याजवळ आणून जाळून टाकला. चेहरा जळालेला असल्याने या घटनेतील मृतक महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे असोला आणि पिंपळगाव लेंडी शिवारात झालेल्या खुनाचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत...
३७ जणांचा गेम होता होता वाचला...
  जिल्ह्यात ३१ खुनाच्या घटना झाल्या त्यात आणखी काही आकडे वाढले असते. तसे प्रयत्न देखील आहे. ३७ जणांचा मर्डर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने ३७ जणांचे प्राण वाचले. या प्रकरणांत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याची नोंद केली आहे...