शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यावर काळवीट शिकार प्रकरण! वन विभागाची मोठी कारवाई; झाडाला टांगून शिकारी विकत होते काळवीटाचे मांस.....

 
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेळगाव-आटोळ अंचरवाडी रस्त्यालगतच्या शेतात दिवसाढवळ्या काळवीटाची बेकायदेशीर शिकार करून त्याचे मांस विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वन विभागाने धाड टाकून एक जिवंत काळवीट, मोठ्या प्रमाणात मांस तसेच शिकार करण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रविवारी (दि. 24 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास अंचरवाडी बिटचे रक्षक गजानन पोटे यांनी पथकासह धाड घातली. या कारवाईत घटनास्थळी एक काळवीट बांधून ठेवलेले आढळले, तर दुसऱ्या काळविटाची हत्या करून त्याचे मांस झाडाला टांगून विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले. ठिकाणाहून मांस कापण्याची हत्यारे, काळविटाची कातडी, पाय, दोन किलोचा वजन काटा तसेच एक दुचाकी (क्र. एमएच 28 बीयू 4923) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धाडीत वनपाल मोहसीन खान, वनरक्षक झोटे व गजानन पोटे यांनी पंचनामा करून काळवीट व जप्त मांस वन विभागाच्या ताब्यात घेतले. वन्यप्राण्यांची शिकार व मांस विक्री हा गंभीर गुन्हा असल्याने दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अवघ्या आठवडाभरापूर्वी अमोना-देऊळगाव घुबे रस्त्यावरही काळवीट बांधून ठेवून मांस विक्रीसाठी तयारी करणाऱ्या तस्करांना स्थानिक युवकांनी हटकले असता त्यांच्यावर चाकूहल्ला झाला होता. आठ दिवसांच्या आत काळवीट शिकारीची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.