काळीपिवळी व दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार जागीच ठार; चिखली–अमडापूर महामार्गावरील दहिगाव फाट्यासमोरील घटना !
Dec 16, 2025, 09:38 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव काळीपिवळी व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १५ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास चिखली–अमडापूर महामार्गावरील दहिगाव फाट्यासमोर घडला. सतीश सदाशिव सपकाळ (वय ३६, रा. करतवाडी, ता. चिखली) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील करतवाडी येथील सतीश सपकाळ हे चिखली येथून आपल्या गावाकडे एम.एच. २८ झेड ६०५४ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने अमडापूरहून प्रवासी घेऊन चिखलीकडे येणाऱ्या काळीपिवळी एम.एच. २८ एच ३३७९ या वाहनाने त्यांच्या दुचाकीस समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सतीष सपकाळ यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. चिखली–अमडापूर मार्गावरील दहिगाव फाटा परिसरात, शेळके यांच्या शेताजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित असलेले रवि पाखरे, संजय गवई, भास्कर पाखरे, रफिक मेंबर, विनोद वानखडे आदी नागरिक तसेच पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका पाचारण करून सतीष सपकाळ यांना चिखली येथील रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सतीश सपकाळ यांचा अकाली मृत्यू झाल्याने करतवाडी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
