बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर; राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव फाट्यावरील घटना..!

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील नायगांव फाट्याजवळील बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 साजीदखान जलीलखान (२२) व मुस्ताकखान जब्बारखान (३८) अशी मृतांची नावे आहेत. तर आरिफखान बशिरखान (३८) हा गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही मलकापूर येथील पारपेठ प्रभागातील रहिवासी आहेत.
दि. २५ रोजी रात्री साडेनऊ वाजता हे तिघे घरून बाहेर पडले होते.
रात्री साडेदहा वाजता पंपावर अपघात घडल्याची माहिती मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आली. तर मध्यरात्री सुमारास गंभीर जखमी आरिफखान याला तातडीने मलकापूर येथील 
आयुष्यमान रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दोन्ही मृतदेहांना तपासानंतर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघात कसा घडला याबाबत वेगवेगळ्या शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.