BIG NEWS : सोमठाणा तिहेरी हत्याकांडाचा थरारक ट्विस्ट! आई, भाऊ अन् पुतण्याला संपवणाऱ्या दीपक सुरडकरचे पनवेलमध्ये आत्मसमर्पण; हत्याकांडानंतर पुतणीला संपवण्यासाठीही गेला?

 तिघांच्या हत्येनंतरही सूडाग्नी शांत झाला नव्हता? दिवठाण्यात पुतणीचे घर बंद, शेलुदमध्ये भावजयीच्या घराजवळ पोहोचला; पोलिस दिसताच माघार! आज चिखली पोलीस आरोपीला घेऊन येणार

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा तिहेरी हत्याकांडात आता सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मुख्य संशयित दीपक फत्तेसिंग सुरडकर याने पनवेल येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याने पनवेल पोलिस ठाण्यात शरणागती पत्करल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहिती मिळताच चिखली पोलिसांचे पथक पनवेलच्या दिशेने रवाना झाले असून, आरोपीला चिखलीत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. वृत्त लिहितेवेळी ( १० ऑक्टोबरच्या सकाळी १० वाजता) आरोपीला पनवेलच्या कोर्टात हजर करण्यात आले होते..

दरम्यान, तिहेरी हत्याकांडानंतर दीपकने संजयच्या मुलीला म्हणजेच स्वतःच्या पुतणीला संपवण्याच्या उद्देशाने दिवठाणा गाठल्याची, तसेच संजयच्या पत्नीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनाक्रमाची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

 तिहेरी हत्याकांडानंतरही सूडाची आग?

८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सोमठाणा येथे घडलेल्या हत्याकांडात सरस्वतीबाई फत्तेसिंग सुरडकर, संजय फत्तेसिंग सुरडकर आणि रणजीत संजय सुरडकर यांचा मृत्यू झाला. या तिहेरी हत्याकांडानंतर दीपक घटनास्थळावरून पसार झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, आईच्या नावावरील जमिनीचा हिस्सा आणि पेन्शनवरून दीपकच्या मनात संजयविषयी नाराजी होती. याच वादातून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून कुरबुरी सुरू असल्याचे सांगितले जाते. घटनेच्या दिवशी शेतातील मोटारीच्या वायरवरून दोघांमध्ये वाद झाला होता. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला; मात्र त्यानंतर काही तासांतच रक्तरंजित घटना घडली.

 ‘वंशाला दिवा ठेवायचा नाही’ या सूडभावनेतून पुतणीच्या घराकडे?

तिघांच्या हत्येनंतर दीपकचा राग शांत झाला नव्हता, अशी माहिती पुढे येत आहे. संजयच्या वंशाचा वारसा संपवण्याच्या उद्देशाने तो संजयची मुलगी वैष्णवी हिच्या दिवठाणा येथील घराकडे गेल्याचे सांगितले जाते. सोमठाण्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील दिवठाण्यात पोहोचला असता, वैष्णवीचे घर बंद असल्याने त्याला तिथे जाता आले नाही, अशी माहिती आहे.
त्यानंतर तो संजयच्या पत्नीला संपवण्यासाठी शेलुद येथे गेल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, तिथे पोलिस दिसल्याने तो माघारी फिरल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर तो पनवेलपर्यंत कसा पोहोचला, त्याला कोणी मदत केली का आणि त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय का घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 मुलगा जगदीशही पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात दीपकचा २० वर्षीय मुलगा जगदीश सुरडकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. हत्याकांडानंतर तो देखील फरार झाला होता, त्याला सवणा गावातून ताब्यात घेण्यात आले.
मुख्य आरोपी दीपक आणि त्याचा मुलगा जगदीश यांच्याबाबतचे आरोप, त्यांची भूमिका आणि घटनाक्रम यांचा तपासातून उलगडा होणे महत्त्वाचे ठरणार आहे. पनवेल पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांचे पथक रात्रीच रवाना झाल्याची माहिती आहे. आज सायंकाळपर्यंत दीपक सुरडकरला चिखलीत आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.