BIG NEWS समृद्धी महामार्गावर महाभयंकर अपघात! एक-दोन नव्हे, तब्बल २५ ते ३० वाहनांचा चेंदा; कंटेनरच्या धडकेनंतर एकामागून एक वाहने आदळली!

खडकपूर्णा नदीच्या पुलावर थरार, जवळपास ३० जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती; सिंदखेडराजाजवळ प्रचंड खळबळ...
 
सिंदखेड राजा (निलेश डीघोळे : बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ खडकपूर्णा नदीवरील पुलावर तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर महामार्गावर अक्षरशः वाहनांचा विचका झाला. या भीषण अपघातात जवळपास ३० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून, जखमींचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. अपघाताची भीषणता पाहता परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील खडकपूर्णा नदीच्या पुलावरून वाहने जात असताना एका कंटेनरने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनर इतर वाहनांना घासत पुढे गेल्याने एकापाठोपाठ एक वाहने एकमेकांवर आदळली. काही क्षणांतच महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांचा मोठा ढीग निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघाताची भीषणता पाहून यंत्रणांची धावपळ!

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

समृद्धीवरील वाहतूक प्रभावित; अपघाताचे नेमके कारण काय?

या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वाहने अपघातग्रस्त झाल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. कंटेनरने वाहनांना धडक नेमकी कशामुळे दिली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.दरम्यान, एकाच अपघातात तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांवर आदळल्याच्या घटनेने समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जखमींची नेमकी संख्या, अपघातातील वाहनांचे नुकसान आणि घटनेचे कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.