BIG NEWS दरोडेखोरांना रोखण्यासाठी एकटा धावला… पण टोळीने घेरलं! काठी-चाकूचे सपासप वार; ५२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत!

 मध्यरात्री नांदुऱ्यातल्या काठी गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ! तीन ठिकाणी घरफोडी अन् लाखोंचा मुद्देमाल लंपास
 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील काटी गावात मध्यरात्री दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरांना पकडण्यासाठी धावलेल्या ५२ वर्षीय शेतकऱ्याचा पाठलाग करून दरोडेखोरांनी त्यांच्यावर काठी आणि चाकूने सपासप वार करत निर्घृण खून केला. एवढ्यावरच न थांबता दरोडेखोरांनी गावातील तब्बल तीन ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे काटी गावासह संपूर्ण परिसर हादरला असून रविवारी सकाळी गावात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते ३.३० वाजेच्या सुमारास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काटी गावात ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. भामट्यांनी गावातील घरे आणि दुकानांना एकाच वेळी धाड टाकून लुटालूट सुरू केली.

चोरांचा पाठलाग केला अन् जीवावर बेतले!

दरम्यान, शेती आणि दुग्धव्यवसाय करणारे रायसिंग सिताराम सोलंकी (वय ५२, रा. काटी) यांना गावात चोरी सुरू असल्याची चाहूल लागली. त्यांनी प्राणाची पर्वा न करता चोरांचा पाठलाग सुरू केला. रायसिंग सोलंकी आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

एका दरोडेखोराने त्यांच्या पाठिमागून काठीने जबर वार केला. त्यानंतर इतर दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सोलंकी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांचा आरडाओरडा ऐकून गावकरी घटनास्थळी धावले.गावकरी जमा होत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. उभ्या करून ठेवलेल्या मोटरसायकलवर बसून अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले.

घरं अन् दुकानांनाही लक्ष्य; मोठ्या तयारीनिशी आले होते दरोडेखोर

दरोडेखोरांनी काटी गावात मोठ्या तयारीनिशी येत तब्बल तीन ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे. यामध्ये बाळू हरिश्चंद्र धांगे यांच्या घरातून सोन्याचे मौल्यवान दागिने, संजय रामभाऊ हिवाळे यांच्या दुकानातून साड्या आणि मोठी रोकड, तर गणेश मानशिंग राठोड यांच्या घरी घरफोडी करण्यात आली.या घटनांमध्ये नेमका किती लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला, याचा अचूक आकडा अद्याप समोर आलेला नसून पोलीस पंचनामा आणि तपासातून चोरीचा एकूण आकडा स्पष्ट होणार आहे.

उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या रायसिंग सोलंकी यांना गावकऱ्यांनी तातडीने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांचे पथक गावात दाखल; डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट टीम सक्रिय

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुनील रत्नसिंग चव्हाण यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना तातडीने माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि अॅनालिसिस टीम काटी गावात दाखल झाली आहे.पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.

आरोपींना तात्काळ अटक करण्याची गावकऱ्यांची मागणी

या मध्यरात्रीच्या थरारक हत्याकांडामुळे काटी गावासह परिसरात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच रात्री दरोडेखोरांनी चोरीसह एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव घेतल्याने गावकऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या खळबळजनक हत्याकांडाचा तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करत असून, दरोडेखोरांच्या टोळीपर्यंत पोलीस कधी पोहोचतात आणि या धुमाकुळामागे नेमके कोण आहे, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.