BIG NEWS अवैध वाळूच्या टिप्परचा पाठलाग करताना देऊळगावराजा तहसीलदारांच्या वाहनाला धडक; ‘उडवून टाक’ची धमकी, लाल ब्रेझाने रस्ता अडवला; टिप्पर पळवून लावले! अंढेरा फाट्यावरील आज पहाटेची घटना...
तक्रारीनुसार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता तहसीलदार वैशाली डोंगरजाळ या आकाश राधाकिसन खरात (तलाठी), पंजाबराव तेजराव ताटे (शिपाई) आणि संतोष धोंडूजी भोपळे (चालक) यांच्यासोबत शासकीय वाहनातून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी निघाल्या होत्या. सकाळी सुमारे ६.४५ वाजता अंढेरा फाट्याजवळ त्या थांबल्या होत्या. याचदरम्यान देऊळगाव महीच्या दिशेने पांढऱ्या रंगाचा वाळूने भरलेला टिप्पर क्रमांक MH 46 D 5511 येताना दिसला. महसूल पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला.
इशारा केल्यानंतर टिप्पर चालकाने वाहन थांबवले. महसूल पथकाने टिप्परची पाहणी केली असता अंदाजे ८० हजार रुपयांची ४ ब्रास रेती असल्याचे आढळून आली. महसूल पथकाने चालकाकडे वाळू वाहतुकीची रॉयल्टी विचारली असता रॉयल्टी नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर टिप्पर कोणाच्या मालकीचा आहे, अशी विचारणा केली असता चालकाने तो हर्षल मनोहर अंभोरे, रा. एकलारा यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर टिप्पर पोलीस ठाण्यात आणण्याच्या सूचना महसूल पथकाने दिल्या.
टिप्पर चालकाचे नाव विचारत असतानाच एक लाल रंगाची ब्रेझा कार तेथे आली. त्यातून एक व्यक्ती खाली उतरली. त्याने आपले नाव हर्षल अंभोरे असल्याचे सांगितले आणि सदर टिप्पर आपलाच असल्याचे सांगितले. त्यानंतर टिप्पर चालकाला टिप्पर घेऊन जाण्यास सांगण्यात आले आणि ‘कोणी मध्ये आले तर उडवून टाक, नंतर मी बघून घेतो’, अशा स्वरूपाचे वक्तव्य करून शासकीय कामात हर्षल अंभोरे याने अडथळा निर्माण केला.यानंतर टिप्पर चालकाने टिप्पर घेऊन चिखलीच्या दिशेने पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
५०० मीटर पाठलाग… अन् पथकाच्या वाहनाला धडक
टिप्पर पळून गेल्यानंतर महसूल पथकाने सुमारे ५०० मीटरपर्यंत खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग केला. टिप्पर चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने महसूल पथकाला जिवे मारण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यातील टिप्पर त्यांच्या वाहनाच्या उजव्या बाजूला धडकविल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या घटनेने महसूल पथकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टिप्परचा पाठलाग सुरू असतानाच मागून पुन्हा एकदा लाल रंगाची ब्रेझा कार आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कारच्या चालकाने महसूल पथकाच्या वाहनासमोर आपली कार आडवी उभी करून रस्ता अडविला आणि अवैध वाळूने भरलेला टिप्पर पळून जाण्यास मदत केली.या संपूर्ण प्रकारामुळे अवैध वाळू वाहतुकीमागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.