

BIG NEWS देऊळगावराजा पोलिसाच्या खून प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात! खून करण्यासाठी माजी सरपंचपतीने दिली होती ६ लाखांची सुपारी ;
मृतक पोलिसाच्या पत्नीसोबत होते अनैतिक संबंध; आधी दारू पाजली, नंतर केला गेम; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम....
Updated: Mar 30, 2025, 21:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा सिंदखेडराजा रस्त्यावरील आर जे इंटरनॅशनल स्कूलसमोरील वनविभागाच्या जागेत स्विफ्ट वाहनात एका पोलिसाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तपासाअंती पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते..दरम्यान दुपारपासूनच स्थानिक गुन्हे शाखेसह देऊळगाव राजा पोलिसांनी वेगवान तपास केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला दुपारीच ताब्यात घेतले होते. त्याचे वृत्त सर्वात आधी "बुलडाणा लाइव्ह" ने दिले होते. खून अनैतिक संबंधातून झाल्याचेही बुलढाणा लाइव्ह ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले होते. दरम्यान आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे..या प्रकरणात आतापर्यंत ४ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचे नाव बाबासाहेब म्हस्के(४२) असून तो गिरोला खुर्दच्या राजकारणात सक्रिय आहे, तो माजी सरपंचपती असून गावगाडा तोच सांभाळत होता,सध्याही आरोपी बाबासाहेब म्हस्के याची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे.
बाबासाहेब म्हस्के याचे मृतक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते..त्यातूनच हा खून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे..
ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना पोलिस दलात हायवे पोलिस म्हणून कार्यरत होते. मूळचे गिरोली खुर्द येथील ज्ञानेश्वर म्हस्के सध्या जालना येथे अंबड चौफुली येथे पत्नी व दोन अपत्यांसह राहत होते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बाबासाहेब म्हस्के याचे मृतक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्याशी घट्ट दोस्ती होती. या दोस्तीचा बाबासाहेब म्हस्के याने गैरफायदा घेतला. त्याचे ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध सुरू झाले. या संबंधात अडसर ठरत असल्यानेच ज्ञानेश्वर म्हस्के यांचा काटा काढायचे बाबासाहेब म्हस्के याने ठरवले होते. त्यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून त्याने जालना येथील "टायगर" नामक एका गुंडाला ५ ते ६ लाख रुपये सुपारी देऊन ठेवली होती..
बाबासाहेब तगादा लावत होता..
सुपारी देऊन ठेवल्याने आरोपी बाबासाहेब हा "टायगर" कडे ज्ञानेश्वर म्हस्के यांचा खून करण्यासाठी तगादा लावत होता. अखेर त्यांनी काल,२९ मार्चचा दिवस निवडला. टायगर ने त्याची दोन माणसे त्या कामासाठी बाबासाहेब म्हस्के याच्या ताब्यात दिली. काल,२९ मार्चच्या रात्री ९:१५ पर्यंत देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल अंबर येथे बाबासाहेब म्हस्के याने मृतक ज्ञानेश्वर म्हस्के यांना दारू पाजली. हॉटेलचे बिल देखील बाबासाहेब म्हस्के यानेच दिले. सदर प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्यानंतर बाबासाहेब म्हस्के आणि इतर टायगर ने पुरवलेल्या दोन सुपारीबाज गुंडांनी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह गाडीत टाकून गाडी गिरोली खुर्द गावाजवळील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जागेत नेऊन ठेवली,आणि आरोपी पसार झाले..आज घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीवरून बाबासाहेब म्हस्के याला ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली..दरम्यान याप्रकरणात खुनाचा कट रचण्यात अप्रत्यक्ष सहभाग असलेला आणखी एखादा आरोपी वाढण्याची शक्यता आहे.. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले आणि त्यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत...