मोठी बातमी! हा कसला बाप? हा तर हैवान..! स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून प्रेग्नेंट केले! डीएनए तपासल्यावर धक्कादायक बाब उघड...जलंब ची घटना वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल..!

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..बातमीचे हेडिंग वाचून तुम्ही बुचकळ्यात पडले असाल..लेकीला जिवापाड जपणारा बाप हा खरंच कसायासारखा निर्दयी वागू शकतो का? पण हे घडलं आहे.. जलंब पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात..! ५ सप्टेंबर २०२३ रोजी जलंब पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा उलगडा आता तब्बल दीड वर्षानंतर झाला आहे.. डीएनए तपासणीचा अहवाल आल्यानंतर धक्कादायक बाब उघड झाली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये जलंब पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून प्रेग्नेंट केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता..मुलीची प्रसूती झाल्यानंतर डीएनए तपासणी करण्यात आली..या तपासणीत निरागस मुलीवर तिच्या सख्ख्या जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याचे उघड झाले आहे..
पोट दुखत होते म्हणून..
  
सप्टेंबर २०२३ मध्ये नांदुरा येथील एका खाजगी दवाखान्यात १७ वर्षीय मुलीला पोटदुखीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोट दुखीचे निदान करण्यासाठी डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टरांना धक्काच बसला..मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले होते. घटनास्थळ जलंब पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने नांदुरा पोलिसांनी तसे पत्र जलंब पोलिसांना दिले. जलंब पोलिसांनी पीडितेच्या राहत्या घरी व गावांमध्ये जाऊन चौकशी केली शोध घेतला मात्र कुणीही सापडले नाही. त्यामुळे खाजगी डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणांमध्ये आरोपीचा कोणताही सुगावा लागत नव्हता, शिवाय पीडित मुलीच्या घरून देखील कोणीही तक्रार करण्यासाठी समोर येत नव्हते. 
डीएनए तपासल्यावर धक्कादायक बाब..
दरम्यान या प्रकरणात मुलीची प्रसूती झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ च्या एप्रिल महिन्यातील २२ तारखेला पीडित मुलगी, तिचा मुलगा आणि पीडित मुलीच्या बापाची डीएनए चाचणी घेण्यात आली. अमरावती येथे डीएनए चाचणी तपासणीसाठी पाठवण्यात आली. डीएनए चाचणीचा अहवाल ११ महिन्यानंतर प्राप्त झाला असून सदर अहवालानुसार अल्पवयीन मुलीवर तिच्या बापानेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. जलंब पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे...