मोठी बातमी! देऊळगावराजा जवळ पोलिसाचा खूनच; ड्रायव्हिंग सीटवर होता पोलिसाचा मृतदेह; मागून आवळला गळा....

 
 देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा सिंदखेडराजा रोडवरील गिरोली खुर्द गावाजवळ वन विभागाच्या जागेत आज ३० मार्चला एका स्विफ्ट गाडीत पोलिसाचा मृतदेह आढळला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती..याबाबत खून की आत्महत्या, की दुसरच काहीतरी असे विविध प्रश्न उपस्थित होत होते..दरम्यान आता पोलिसाचा मृतदेह गाडीतून बाहेर काढल्यानंतर हा खूनच असल्याचे स्पष्ट झाले आहे. अज्ञात आरोपींनी मागे बसून पोलिसाचा गळा आवळून खून केला असावा असा अंदाज आहे. एम एच २० , डीव्ही ३०६३ क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीत पोलिसाचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवरच होता. ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के(३८, रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगावराजा) असे खून झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते जालना पोलीस दलात कार्यरत होते..

   आज सकाळी देऊळगाव राजा सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जंगलात मुख्य रस्त्यापासून ७० ते ८० मीटर अंतरावर एक स्विफ्ट डिझायर गाडी उभी होती. त्यात एका पोलिसाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी.महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक, फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. मात्र पुरेशा पुराव्या अभावी राणी श्वान घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत गेली आणि तिथून पुन्हा घटनास्थळापर्यंत परत आली. दरम्यान मृतक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून खून केल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. तशा खुणा म्हस्के यांच्या गळ्यावर आहेत..म्हस्के यांचा मृतदेह ड्रायव्हिंग सीटवर होता, अज्ञात आरोपींनी मागच्या सीटवर बसून म्हस्के यांचा गळा आवळला असावा असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे..
गावाकडे नेहमी यायचे ...
 स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक ज्ञानेश्वर म्हस्के अतिशय शांत स्वभावाचे होते. जालना येथील अंबड चौफुली जवळ ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. गावाकडे गिरोली खुर्द येथील घरी आई आणि त्यांची बहीण राहते. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. गावाकडे शेती व इतर कामासाठी ज्ञानेश्वर म्हस्के यांचे नेहमी येणे जाणे असायचे..