BIG BREAKING | बुलढाणा जिल्हा हादरला! सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; भाऊच ठरला भावाचा वैरी! आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची निर्घृण हत्या; आरोपी दीपक सुरडकर फरार, पोलिसांचा शोध सुरू

 
चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणारी तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात गुरुवारी सायंकाळी घडली. सख्ख्या भावानेच आपल्या आईसह भाऊ आणि पुतण्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या रक्तरंजित घटनेने सोमठाणा गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना आज सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. या हल्ल्यात सरस्वतीबाई सुरडकर (वय ७०), संजय सुरडकर (वय ४५) आणि रणजीत संजय सुरडकर (वय २०) यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भाऊच झाला भावाचा वैरी!

प्राथमिक माहितीनुसार, दीपक सुरडकर याने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर तो फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी आणि पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोमठाणा गावात तणावाचे वातावरण

एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याने सोमठाणा गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागे कौटुंबिक वाद आहे की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दरम्यान, आरोपी दीपक सुरडकर याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून, या तिहेरी हत्याकांडामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.