BIG BREAKING सिंदखेडराजा तहसील कार्यालयात लाच घेताना तलाठी आणि महसूल सहाय्यक रंगेहात अटकेत!लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांची कारवाई...

 

बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
सिंदखेडराजा तहसील कार्यालयात तलाठी व महसूल सहाय्यक या दोघांनी मिळून जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्या पथकाने या दोघा लोकसेवकांना रंगेहात अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणातील आरोपी लोकसेवक म्हणजे रावसाहेब बापुराव काकडे (वय ५७ वर्ष), तलाठी, खामगाव सज्जा, सिंदखेडराजा आणि मनोज काशीनाथ झिने (वय ४९ वर्ष), महसूल सहाय्यक, देऊळगावराजा हे असून त्यांनी मौजे तांदुळवाडी, ता. सिंदखेडराजा येथील गट नंबर २४ मधील जमिनीच्या वाटणीसंदर्भातील प्रकरणात तडजोडीअंती आदेश देण्यासाठी ७,००० रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधताच सापळा रचण्यात आला. २४ जून २०२५ रोजी सिंदखेडराजा तहसील कार्यालयात लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक मनोज झिने यांना रंगेहात पकडण्यात आले. तपासात तलाठी काकडे यांचीही भूमिका निष्पन्न झाली आहे.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. मारुती जगताप आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक रमेश पवार व त्यांच्या पथकाने कारवाई केली. या पथकात एएसआय शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण बैरागी, राजेंद्र क्षिरसागर, पोना. जगदिश पवार, विनोद लोखंडे, पोकॉ. शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, नितीन शेटे, शेख अरशद यांचा समावेश होता.
संबंधित आरोपींविरुद्ध सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा कार्यालयाच्या ०७२६२-२४२५४८ या दूरध्वनी क्रमांकावर, मोबाईल क्रमांक ९५५२५२०१८८ वर किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांनी केले आहे.