BIG BREAKING मेहकरच्या जिजामाता करिअर अकॅडमीने गोरगरीब विद्यार्थ्यांना १ कोटी ३४ लाख रुपयांनी लुटले!

सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लुबाडले पैसे; एकेकाकडून उकळले लाखो; मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
 
Fraud

मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सैन्यात नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवत गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने सैन्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीच्या संचालकानेच हा घोळ केला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून आज मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

४० विद्यार्थ्यांकडून तब्बल १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये भामट्याने लुटले आहेत. प्रदीप एकनाथ खिल्लारे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याची पत्नी पूजा खिल्लारे, आरोपीचा भाऊ प्रशांत एकनाथ खिल्लारे ,वडील एकनाथ खिल्लारे, आई रत्नमाला खिल्लारे या ५ जणांना देखील पोलिसांनी आरोपी केले आहे.

जिकुल्ला शेख गुलाब (२५, रा.वॉर्ड न १७, मेहकर) याने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्याची स्वतः १ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक झाली आहे. तुझी ग्राउंड ची तयारी चांगली आहे, मी तुला आर्मी मध्ये नोकरीला लावून देतो त्यासाठी तुला ४ लाख रुपये द्यावे लागतील असे जिजामाता करिअर अकॅडमी चा संचालक प्रदीप खिल्लारे याने जिकुल्ला याला सांगितले होते. त्यावेळी त्याने १ लाख २० हजार रुपये प्रदीप खिल्लारे याला दिले होते. ही घटना कोरोना आधीची आहे. 
कोरोना लागल्यामुळे प्रशिक्षण बंद होते. कोरोना संपल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाल्यावर जिकुल्ला शेख याने प्रदीप खरात याला नोकरी बाबत विचारणा केली. त्यावेळी तू माझ्यावर विश्वास ठेव तुला डायरेक्ट ऑर्डर येईल असे प्रदीप खरात म्हणाला होता. मात्र त्यानंतर जिकुल्ला शेख याला माहीत पडले की प्रदीप खरात याने अशाच पद्धतीने सगळ्यांना सांगून तब्बल ४० जणांकडून पैसे उकळले आहेत.
४० जणांकडून उकळण्यात आलेल्या रकमेची एकूण बेरीज १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये एवढी आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी प्रदीप खरात याला अटक केली असून त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.