BIG BREAKING‘आमदार श्वेता महालेंच्या भरोशावर जास्त उड्या मारतो का?’ म्हणत बुलढाण्यात भाजप नगरसेवकाला बंदूक आणि तलवार दाखवत धमकी?

बुलडाण्यात राजकीय वादाला गुन्हेगारी रंग! म्हणे, तुझे तुकडे करून कारंजा चौकात फेकतो...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. भाजपचे नगरसेवक आकाश विजय दळवी यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यासोबत शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेने शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ८ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता बुलडाणा शहरातील कारंजा चौक परिसरात ही घटना घडली आहे..

तक्रारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास कारंजा चौक परिसरातील दुर्गादेवी मंदिरात आरतीसाठी गेले असताना निखिल शर्मा, आर्यन निखिल शर्मा व वंश निखिल शर्मा हे तेथे आले. यावेळी ‘तू आमदार श्वेता महाले यांच्या भरोशावर जास्त उड्या मारतो का?’ अशा आशयाचे बोलून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे. वाद वाढल्यानंतर आपल्याला मारण्यासाठी संबंधित पुढे सरसावले असता, सोबत असलेले तिलक दीपक तोंडीलायत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर हा वाद थांबण्याऐवजी पुढे तिरुपती मंगल कार्यालयासमोरील परिसरात पोहोचल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे पुन्हा शिवीगाळ करून घराबाहेर बोलावण्यात आले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधितांनी घरातून बाहेर येत काळ्या रंगाची बंदुकीसारखी वस्तू, लोखंडी रॉड आणि लोखंडी तलवार हातात घेतली आणि धमकी दिली. ‘मर्डर काय असतो, तुला आजच दाखवतो’, अशा आशयाच्या धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
इतकेच नव्हे तर,"तुला तुकडे करून कारंजा चौकात फेकतो’, अशा आशयाच्या धमक्या दिल्याचेही नगरसेवकाने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकारानंतर ते तिलक तोंडीलायत यांच्यासह बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले.

आमदार गायकवाड विरुद्ध आमदार महाले वादाच्या पार्श्वभूमीवर घटना चर्चेत

विशेष म्हणजे, बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय व इतर कारणांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता एका भाजप नगरसेवकाला धमकी देताना आमदार श्वेता महाले यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचा आरोप समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय किनार मिळाली आहे.
तक्रारीत पंकज परसराम शिंदे, अमोल सुभाष जगताप आणि राजगुरे हे घटनेचे साक्षीदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी घटना पाहिल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

दरम्यान, बुलडाणा शहर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार असली, तरी भाजप नगरसेवकाच्या तक्रारीत थेट आमदार श्वेता महाले यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने बुलडाण्याच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.आता पोलिस तपासात नेमके काय समोर येते आणि या राजकीय संदर्भातील धमकीमागचे खरे कारण काय, याकडे बुलडाणेकरांचे लक्ष लागले आहे.