BIG BREAKING : बुलडाणा जिल्हा हादरला! दरवाजा फोडून घरात घुसले; नवऱ्याच्या गळ्याला चाकू लावून पत्नीवर आळीपाळीने अत्याचार; मलकापूर तालुक्यातील संतापजनक घटना

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मानवी संवेदनांना हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोन अज्ञात आरोपींनी एका दांपत्याच्या घराचा दरवाजा फोडून प्रवेश केला. चाकू आणि विळ्याचा धाक दाखवत लुटमार केल्यानंतर पती-पत्नीला शेतात फरफटत नेण्यात आले. तेथे पतीच्या गळ्याला चाकू लावून त्याच्यासमोरच पत्नीवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. अत्याचारानंतर दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मलकापूर तालुक्यातील एका गावात घडली. पीडित दांपत्य परराज्यातून मजुरीसाठी या भागात आले असून, एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात राहत होते. मजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते.

शुक्रवारी (१७ जुलै) रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास दोघेही मोबाईल पाहत झोपण्याच्या तयारीत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. एका आरोपीच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता. आरोपींनी दांपत्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी केली. मात्र दागिने नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपी अधिकच आक्रमक झाले.

यानंतर आरोपींनी पती-पत्नीला जबरदस्तीने शेतात नेले. तेथे एका आरोपीने पतीच्या गळ्याला चाकू लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली, तर दुसऱ्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी भूमिका बदलून पुन्हा महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर दोघेही आरोपी मोटारसायकलवरून फरार झाले.पीडित दांपत्याला आरोपींची ओळख नसल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर भयभीत झालेल्या दांपत्याने शनिवारी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून, या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली असून, या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.