BIG BREAKING! तारीख ठरली म्हणतात... २२ सप्टेंबरला राहुल बोंद्रे भाजपच्या गोटात? समर्थकांना भावनिक कॉल; ‘परिस्थिती कोणतीही असो, नातं आणि विश्वास कायम राहावा...’

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांपासून चिखलीच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरापासून ‘तारीख पे तारीख’ सुरू असताना आता २२ सप्टेंबरच्या सायंकाळी मुंबईत राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातील सूत्रांकडून मिळत आहे. या प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीची चर्चा आहे.

विशेष म्हणजे प्रवेशाच्या चर्चेआधीच राहुल बोंद्रे यांच्याकडून समर्थकांना करण्यात येत असलेला एक रेकॉर्डेड कॉल सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. या कॉलमधील भावनिक संदेशामुळे बोंद्रे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार, याबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

‘परिस्थिती कोणतीही असो... नातं आणि विश्वास कायम राहावा!’

या रेकॉर्डेड कॉलमध्ये राहुल बोंद्रे म्हणतात, “आयुष्यात मला अनेक माणसं भेटलीत, अनेक अनुभव आलेत. पण काही माणसं अशी आहेत की जात, धर्म, पक्ष, परिस्थिती न पाहता अत्यंत विश्वासाने व निस्वार्थपणे माझ्यासोबत राहिली. माझ्या चांगल्या-वाईट काळात अत्यंत विश्वासाने तुमची मोलाची साथ मला लाभली. पुढे परिस्थिती कोणतीही असो, आपल्यातलं नातं व विश्वास कायम राहावा, एवढीच मनापासून इच्छा. आभारी आहे.”

बोंद्रेंच्या या संदेशाने समर्थकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. पक्षबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच ‘नातं आणि विश्वास कायम राहावा’ हा उल्लेख केल्याने त्यांच्या राजकीय निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विखे पाटलांच्या मध्यस्थीची चर्चा; प्रवेशाला विलंब का?

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू आहे. यादरम्यान प्रवेशासाठी वेगवेगळ्या तारखाही समोर आल्या. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रवेशाची प्रक्रिया पुढे सरकल्याने त्याला काहीसा विलंब झाल्याची चर्चा आहे.

मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होती. आता हे आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्यानंतर बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशासाठी हालचालींना वेग आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सर्वात मोठा प्रश्न : श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे एकाच पक्षात?

राहुल बोंद्रे भाजपमध्ये दाखल झाल्यास चिखलीच्या राजकारणातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांचे राजकीय समीकरण हा असेल.

चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या श्वेता महाले आमदार आहेत. बोंद्रे आणि महाले यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या काही वर्षांपासून चांगलाच गाजला आहे. २०१९ आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्येही दोघे आमनेसामने होते.

आता हाच राजकीय संघर्ष जर पक्षाच्या चौकटीत आला, तर चिखली भाजपमध्ये नवे समीकरण कसे आकार घेणार? बोंद्रेंची भूमिका काय असणार? महाले-बोंद्रे यांच्यातील राजकीय संबंध कोणत्या दिशेने जाणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला, तरी २२ सप्टेंबरच्या संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे चिखलीच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. आता या चर्चांना प्रत्यक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.