BIG BREAKING! ‘कायदा सगळ्यांना समान’;‘बापासारखं शरीर कुठून आणणार?’ आमदार संजय गायकवाडांना आमदार श्वेता महालेंसह महिलांबाबतचे वक्तव्य भोवले;

रात्री उशिरापर्यंत गदारोळ, अखेर बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला!

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महिलांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत आले आहेत. आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचा संदर्भ देत माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता भगवान बेंडवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. १ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणे वाजवण्यात आले होते. हे गाणे कोणालाही उद्देशून नव्हते, असा दावा तक्रारदार सविता बेंडवाल यांनी केला आहे.

मात्र, ७ सप्टेंबर रोजी माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी या रॅलीच्या संदर्भात वक्तव्य केले. ‘बाप तो बाप रहेगा हे माणसानं बोललेलं बरं आहे, आता हे एखाद्या बाईनं म्हटलं, मी बाप आहे, तर बापासारखं शरीर कुठून आणणार?’ अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यादरम्यान महिलांच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे हातवारेही करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. आमदार गायकवाड यांनी केवळ एका महिलेचा उल्लेख न करता ‘एखाद्या बाईने’ असे सर्वसाधारण शब्द वापरल्याने हे वक्तव्य महिलांच्या शारीरिक ठेवणीवर आणि क्षमतेवर उपहासात्मक, अश्लील व अवमानकारक टिप्पणी करणारे असल्याचे  तक्रारीत म्हटले आहे.

आमदार गायकवाड यांचे हे विधान महिलांच्या शारीरिक ठेवणीवर केलेला हल्ला असून, त्यामुळे महिलांच्या मनास लज्जा निर्माण झाल्याचे तक्रारदारांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत भाजप कार्यकर्ते आणि महिलांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या धरला होता. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अखेर आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ‘कायदा सगळ्यांसाठी समान’ हा संदेश देत पोलिसांनी विद्यमान आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने या कारवाईकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.