Big breaking! ‘बुलडाणा लाइव्ह’च्या दुपारच्या बातमीवर सायंकाळी शिक्कामोर्तब; राहुल बोंद्रे म्हणाले, ‘भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय!’ मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत म्हणाले...
चिखलीचे माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल बोंद्रे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ प्रसिद्ध केला. “मी आतापर्यंत काँग्रेससाठी सर्वस्व अर्पण केले. माझ्या हयातीत अनेक वर्षे मी काँग्रेससाठी काम केले. आता मी वेगळा राजकीय निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
‘काँग्रेसने खूप काही दिलं... मुकुल वासनिकांनी प्रेम दिलं!’
भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर करताना राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमधील आपल्या जुन्या सहकाऱ्यांचा आवर्जून उल्लेख केला. “काँग्रेसने मला खूप काही दिलं. मुकुल वासनिक यांनी प्रेम दिलं, हर्षवर्धन सपकाळ यांनी लहान भावासारखं प्रेम दिलं. किती नावं घेऊ?” असे म्हणत त्यांनी जुन्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.राजकीय वाटा वेगळ्या झाल्या तरी वैयक्तिक नाती आणि परस्पर आदर कायम राहणार असल्याचेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले. “जुने सहकारी, जुने मित्र यांना आयुष्यभर विसरू शकणार नाही. राजकीय वाट वेगळी निवडली असली तरी प्रेम आणि नातं कायम राहील,” असे ते म्हणाले.
राजकीय निर्णय जाहीर; मात्र प्रवेशाची तारीख अजून सांगितली नाही
गेल्या अनेक दिवसांपासून राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र, प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे अधिकृतपणे समोर आले नव्हते. आता बोंद्रे यांनी स्वतःच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.मात्र, त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये भाजप प्रवेशाची नेमकी तारीख आणि ठिकाण जाहीर केलेले नाही. त्यामुळे २२ सप्टेंबरला मुंबईत प्रवेश होणार असल्याच्या चर्चेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला; ‘वेगवेगळे रस्ते शेवटी...’
आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला दिला. शिकागो येथील जागतिक धार्मिक परिषदेत स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला सर्व धर्मांची जननी म्हटल्याचा उल्लेख त्यांनी केला.“वेगवेगळे रस्ते शेवटी एका ठिकाणी मिळतात. सर्व धर्म सत्य आहेत, हा स्वामी विवेकानंदांचा विचार होता. स्वामी विवेकानंदांचे विचार माझ्यासाठी आदर्श आहेत,” असे बोंद्रे यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय स्वतः जाहीर केल्याने चिखलीच्या राजकारणात आता नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः विद्यमान भाजप आमदार श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील प्रदीर्घ राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर चिखलीतील पक्षांतर्गत राजकारणाची दिशा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.