

लहान मुलांकडून काम करून घ्याल तर खबरदार..! नांदुऱ्यात गॅरेज मालकाला दणका; अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणे भोवले: गुन्हा दाखल...
Jan 17, 2025, 09:31 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन किशोरवयीन मुलांकडून काम करवून घेत पिळवणूक करणाऱ्या येथील इंडियन सुपर ऑटो गॅरेज मालकावर बाल गुन्हेगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कृती दलाच्या पथकाने १६ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता ही कारवाई केली.
अमरावतीचे कामगार उपायुक्त नि.पा. पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे प्रभारी सहायक कामगार आयुक्त रा.रा. काळे, बुलढाण्याचे प्रभारी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी म.तु. जाधव यांच्या निर्देशानुसार बाल कामगार धाडसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नांदुरा येथे किशोरवयीन मुलांकडून प्रचंड मेहनतीची कामे करवून घेतली जात असल्याची माहिती प्राप्त होताच कृती दल अलर्ट झाले.
त्यानुसार १६ जानेवारीला दुकान निरीक्षक आर. के. वनारे, एस. आर. हुडेकर, एस.एम. देशमुख, जे. एन. प्रधान यांच्यासह नांदुऱ्याचे गटशिक्षणाधिकारी महिला व बाल विकास अविभागाचे क्षेत्रीय अधिकारी नीलेश चौथनकर, हर्षदीप वानखेडे, श्याम आघाव तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारला. यावेळी इंडियन सुपर ऑटो गॅरेजवर दोन किशोरवयीन कामगार काम करत असल्याचे आढळले. त्या दोन्ही मुलांची सुटका करण्यात आली. निरीक्षक राजेश वनारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गॅरेज मालकावर बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम १९८६ चे कलम १४, ३, ३ (ए), सहकलम ७७, ७९ अल्पवयीन न्याय कायदा २०१५, भारतीय न्याय संहिता १४६ कलमांनुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास पोहेकॉ मोरे करीत आहेत....