जुन्या वादातून बेदम मारहाण; उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू! शेगाव तालुक्यात खळबळ! तिघांना अटक....
Jun 19, 2025, 19:11 IST
जलंब (बुलडाणा लाइव वृत्तसेवा) – शेगाव तालुक्यातील जलंब येथे जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. योगेश प्रल्हाद मोहे (वय ३२) असे मृत युवकाचे नाव असून, त्यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना १४ जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपी वासुदेव धोडुजी मोहे, गजानन धोडुजी मोहे, शालीग्राम धोडुजी मोहे आणि विशाल शालीग्राम मोहे (सर्व रा. जलंब) यांनी मिळून योगेश मोहे यांना गावातील संतोष काळे यांच्या घराजवळ पकडले आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला व त्यानंतर नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरु असतानाच १८ जून रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी योगेश मोहे यांची पत्नी पल्लवी योगेश मोहे यांनी शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेनंतर पोलीसांनी तातडीने कारवाई करत गुरुवारी रात्रीच तिन्ही आरोपींना जलंब येथून अटक करण्यात आली आहे.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.