शिवणी–तळसवाडा रस्त्यावर ऑटोचालकाची हत्या; गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय...
प्राप्त माहितीनुसार, अमोल भवरे हा ऑटोचालक असून शेती व्यवसायही करत होता. बुधवारी (दि. ७ जानेवारी) सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजेदरम्यान तो स्वतःचा ऑटो घेऊन शिवणी व भोळी शिवारातील शेत पाहण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, गुरुवारी सकाळी सुमारे ७ वाजता तळसवाडा–शिवणी रस्त्यालगत राजू रजनिकांत नारखेडे (रा. तळसवाडा) यांच्या शेताच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. अजय अनिल गायकवाड (रा. निंबोळी) यांनी ही बाब गावातील नागरिकांना कळविल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता तो मृतदेह अमोल भवरे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, मलकापूर येथे पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात मृतकाच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
या प्रकरणी मृतकाचे नातेवाईक विजय प्रभाकर भवरे (वय ४९, रा. शिवणी) यांनी तोंडी फिर्याद दिली असून, मृत्यूबाबत कोणावरही थेट संशय व्यक्त करण्यात आलेला नसला तरी कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मर्गचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय टेकाडे (पोस्टे प्रभारी, एमआयडीसी मलकापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, खुनामागील नेमके कारण, आरोपी कोण, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मृतकाचे शेवटचे संपर्क, तसेच वैयक्तिक किंवा व्यावसायिक वादाच्या अनुषंगाने पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
