भरधाव ऑटोची बैलगाडीला धडक; १६ वर्षीय युवक ठार, दोघे जखमी; जलंब ते खामगाव रस्त्यावरील घटना...

 
 जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव ऑटो बैलगाडीवर धडकल्याने १६ वर्षीय युवक ठार झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जलंब ते खामगाव रस्त्यावर घडली. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, माटरगाव (ता. शेगाव) येथील रहिवासी शेख परवेज उर्फ पप्पू शेख महेबुब हा त्याच्या एम.एच. २७-२८१८ क्रमांकाच्या ऑटोने जलंबकडे जात होता.
दरम्यान, त्याने वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवित बैलगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोत बसलेला रहीम उर्फ गोल्या (वय १६, रा. माटरगाव) हा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. तर शेख फयुम व नरवाडे हे दोघे जखमी झाले असून बैलगाडीचेही नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर माटरगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबतची फिर्याद शेख हरुण शेख मेहबुब (रा. माटरगाव) यांनी जलंब पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी ऑटोचालक शेख परवेज उर्फ पप्पू शेख महेबुब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ नन्हेखॉ तडवी करीत आहेत.