पोलिस ठाण्यातच पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; कोर्टातील कौटुंबिक वाद थेट पोहोचला पोलीस ठाण्यात, शहरात एकच खळबळ!
माहितीनुसार, न्यायालयातील कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीनंतर संबंधित महिला तक्रार नोंदविण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. याचवेळी दोघींमध्ये पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद क्षणातच विकोपाला गेला आणि एका महिलेने सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाली.घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी वेळीच धाव घेत संबंधित महिलेला रोखले आणि तिच्या हातातील पेट्रोलची बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी फिर्यादी शाहीन परवीन इल्यास अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी रुखसाना ताजनगर (रा. फिरोजनगर), रेहाना अहमद (रा. शरीफनगर), शेख जहीर आणि शेख मुर्तुजा (दोघेही रा. खामगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने रुखसाना नवेद खान यांनीही दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादी शाहीन परवीन इल्यास अहमद, शेख शाहीन, शेख जहीर, शेख सर्वत व मुरसलीन शेख अयाज खान (सर्व रा. खामगाव) यांच्याविरुद्धही न्यायालय परिसरात शिवीगाळ, धक्काबुक्की व अपमान केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणीच पेट्रोल ओतून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.