अवैध मुरुम उत्खननावर कारवाईस गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावर हल्ला; मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की, पोलिसांत गुन्हा...

 
सुलतानपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लोणार तालुक्यातील बोरखेडी शिवारात अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकाला धमकावत मंडळ अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना गुरुवारी (११ डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लोणार तहसीलदार भूषण पाटील, नायब तहसीलदार मयुर इप्पर, मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप व ग्राम महसूल अधिकारी संतोष पनाड यांचे पथक बोरखेडी परिसरात मुरुमाच्या अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेले असता, बोरखेडी गावातून पारडी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जेसीबीच्या सहाय्याने गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान संबंधितांनी आक्रमक भूमिका घेत पथकाला धमक्या दिल्या. “वाहनांना हात लावून दाखवा, एकेकाला पाहून घेऊ,” अशी धमकी देत आठ ते दहा जणांनी मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. याचवेळी टिप्पर चालकाने पथकाचा मार्ग अडविण्यासाठी टिप्परमधील मुरुम रस्त्यावर टाकून वाहतूक ठप्प केली. त्यानंतर उत्खननासाठी वापरण्यात आलेली जेसीबी, टिप्पर व कार घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी संतोष पनाड यांच्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा, धमकी, चोरी, रस्ता अडवून गोंधळ घालणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून एक जेसीबी व एक टिप्पर ताब्यात घेतले आहे. इतर वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक अवचार यांनी दिली.
 विशेष म्हणजे, याच परिसरात २ डिसेंबर रोजीही अवैध मुरुम उत्खनन व विना रॉयल्टी वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवर तहसीलदार भूषण पाटील यांनी कारवाई करत १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, त्यानंतरही अवैध उत्खनन सुरूच असल्याने महसूल व पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.