थकीत वीजबिलाची वसुली करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला; देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल...

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर शिवीगाळ व मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोहम्मद आकीब मोहम्मद लुकमान (वय २७, व्यवसाय नोकरी, रा. संजय नगर, देऊळगाव राजा, जात – मुस्लिम) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शासकीय कर्मचारी असून दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ते देऊळगाव मही येथे आरोपी संतोष भानदास नागरे (रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जात – वंजारी) याच्याकडे थकीत वीजबिलाची रक्कम मागण्यासाठी गेले होते.
यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून तोंडावर चापट मारली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करत “खांब्याला बांधून ठेवीन” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल तसेच इतर कागदपत्रांच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये अप. नं. ११/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १३२, १२१ (१), ३५२, ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा पोहेका नायबराव मोगल यांनी दाखल केला असून,पुढील तपास ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.
या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.