मध्यरात्री दीड वाजेची वेळ..दोघे गावात शिरले,अल्पवयीन मुलीला घेऊन गेले! खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना...
Apr 27, 2026, 09:27 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील माटरगाव (गेरू) येथे १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे आमिष दाखवून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी मोताळा तालुक्यातील दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ८ एप्रिल २०२६ पासून खामगाव माटरगाव येथे गावातील नातेवाईकांकडे राहत होती. दरम्यान, २४ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास सुमीत आनंद जाधव (रा. मोताळा) याने काहीतरी आमिष दाखवून तिला तेथून पळवून नेले. या घटनेत निखील मेहेरसिंग जाधव (रा. मोताळा) याने आरोपीला मदत केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिवरखेड पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला वेग दिला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील साठे करीत आहेत.