प्रेमप्रकरणातून लाठ्याकाठ्यांनी मारहाण; राऊत व दहीभात कुटुंबातील १७ जणांविरुद्ध गुन्हे खामगाव तालुक्यातील पातोंडा येथील घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रेमसंबंधाच्या कारणावरून खामगाव तालुक्यातील पातोंडा गावात राऊत व दहीभात कुटुंबीयांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन रक्तरंजित प्रकार घडला आहे.

१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अमोल दहीभात (वय ३०, रा. पातोंडा) व त्याच्या आईला राऊत कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सध्या मायलेकांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांत राऊत कुटुंबातील १३ जणांविरुद्ध, तसेच दहीभात कुटुंबातील ४ जणांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमोल दहीभात यांचे मामा नारायण हरिभाऊ मोरखडे (रा. गोळेगाव, ता. शेगाव) यांच्या तक्रारीवरून अंबादास राऊत, संतोष अंबादास राऊत, महादेव अंबादास राऊत, चंदू राऊत, श्रीधर राऊत, अक्षय राऊत, कु. शिवानी महादेव राऊत, सौ. संगीता महादेव राऊत, सौ. विजय संतोष राऊत, कु. वसाक्षी महादेव राऊत, सौ. पूनम चंद्रकांत राऊत, सौ. शोभा अंबादास राऊत व कु. भक्ती संतोष राऊत (सर्व रा. पातोंडा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तर संतोष राऊत यांच्या तक्रारीवरून भागवत जनार्धन दहीभात, रुख्माबाई जनार्धन दहीभात, अमोल रमेश दहीभात व जनार्धन दहीभात (सर्व रा. पातोंडा) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.