१७ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार; बेल्टने मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या; मलकापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावात राहणाऱ्या आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ७ जानेवारीच्या पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे मलकापूर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वरखेड येथील रहिवासी करण दादाराव वानखेडे (वय १९) याने सुरुवातीला पीडितेचा पाठलाग सुरू केला. तिच्याशी जवळीक साधत विनयभंग केला. मात्र पीडिता प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच आरोपीने कंबरपट्ट्याने (बेल्टने) तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

याचबरोबर आरोपीने पीडिता व तिच्या कुटुंबीयांना फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर पीडितेने व तिच्या कुटुंबीयांनी मोठे धैर्य दाखवत मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम ७४, ७५, ६४, ११५(२), १३७(२), ३५१(२)(३) तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कलम ४, ६, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अहवालात शरीरावरील दुखापती व अत्याचारासंदर्भातील महत्त्वपूर्ण निरीक्षणांची नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या घटनेचा पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत असून, संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.