अल्पवयीन बालिकेवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी व २५ हजारांचा दंड...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा  १२ डिसेंबर रोजी विद्यमान विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. बी. जाधव (मलकापूर) यांनी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीच्या गावातील एक अल्पवयीन बालिका घरी एकटी असताना आरोपी संतोष उत्तम मोहीते याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. सदर घटना घडत असतानाच पीडितेची आई घरी आली व आरोपीच्या तावडीतून पीडितेची सुटका केली. त्यानंतर मुलीसह पोलीस स्टेशन धामणगाव बढे येथे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२२ नुसार भादंवि कलम ३७६ एबी, ३७६ (२)(एन), ४५२ तसेच ५०६, ३२३ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को अॅ६क्ट) कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या  गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आशिष गंदे (पो.स्टे. धामणगाव बढे) यांनी करून तपासाअंती दोषारोपपत्र विशेष सत्र खटला क्रमांक ५५/२०२२ म्हणून सत्र न्यायालय, मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणात सुनावणी पूर्ण होऊन पीडित मुलगी, तिची आई तसेच इतर साक्षीदार व तपास अधिकारी असे एकूण १३ साक्षीदार सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विवेक मा. बापट यांनी तपासले. सादर पुराव्यांवरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अंतिम युक्तिवाद होऊन सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ एबी तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को अॅयक्ट) कलम ५ (एम) व ६ नुसार वीस वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच भा.दं.वि. कलम ४५२ नुसार पाच वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्याचा आदेश देण्यात आला आहे.सदर प्रकरणात पैरवी अधिकारी संजय निंबाळकर यांनी पैरवीचे काम पाहिले. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.