बुलढाण्याच्या होतकरू इंजिनियरची बोईसरमध्ये आत्महत्या; विराज प्रोफाईल्समधील छळाचा बळी? सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांची नावे; जातिवाचक शिवीगाळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप! उद्योगविश्व हादरले...
प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून विराज प्रोफाईल्स कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. मात्र कंपनीचे मालक नीरज कोच्चर, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी सातत्याने मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक, जीवे मारण्याच्या धमक्या आणि सततचा मानसिक दबाव यामुळे प्रदीप जाधव प्रचंड तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बोलावण्यात आले होते. या बैठकीला सीईओसह एकूण नऊ जण उपस्थित होते. बैठकीदरम्यान जाधव यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. त्यांना मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या बैठकीनंतर प्रदीप जाधव थेट आपल्या निवासस्थानी परतले आणि आत्महत्या करण्यापूर्वी सविस्तर सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली. पत्नी वंदना प्रदीप जाधव यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जाधव कुटुंबीयांनी या प्रकरणात केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून न थांबता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पत्नी वंदना जाधव आणि मुलगा यश जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कथित मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विधानसभा अधिवेशनात या घटनेची चर्चा करून जाधव कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा तसेच खासगी कंपन्यांमध्ये वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित मानसिक छळावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर धोरण राबवावे, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे.
सुसाईड नोटमधील उल्लेख, पोस्टमार्टम अहवाल आणि पोलिस तपासाच्या निष्कर्षांनंतर विराज प्रोफाईल्स कंपनीच्या मालकासह संबंधित नऊ जणांविरोधात नेमकी कोणती कारवाई होते, याकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.