उधारीच्या पैशावरून खामगाव तालुक्यात आणखी एक मर्डर! शेजाऱ्याने शेजाऱ्याला ठोकले..!

 

 

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत खुनाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. खामगाव तालुक्यात दोन दिवसाआधीच एक खून झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका मर्डर प्रकरण समोर आले आहे. शेजाऱ्याने उधारीने घेतलेल्या पैशातून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील शहापुरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत सौ. रीना माणिकराव शिरसाट (३०) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी दिली आहे की, त्यांचे जेठ अजबराव शिरसाट यांनी घरा शेजारी राहणारा अनिल प्रल्हाद रामचवरे याच्या कडून हात उसने पैसे घेतले होते. या पैशावरून अजबराव शिरसाट व रामचवरे यांच्यात वाद होत होते. दरम्यान ३० एप्रिल रोजी पुन्हा याच कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. अनिल रामचवरे याने अजबराव शिरसाट यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून त्यांना गंभीररित्या जखमी केले. गावकऱ्यांनी हा वाद सोडवून जखमी अजबराव शिरसाट यांना तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या ठिकाणी उपचार दरम्यान अजबराव शिरसाट यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आधी पोलिसांनी हाणामारीचे गुन्हे दाखल केले होते त्यात आता खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.