संतापजनक..! लाज सोडली! नात्याला काळीमा; २६ वर्षीय मामाचा अल्पवयीन भाचीवर बलात्कार; भाचीच्या मणक्याचे ऑपरेशन झाले, नीट चालताही येईना...! शेगावची घटना..!!
Sep 14, 2024, 16:02 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज सकाळीच "बुलडाणा लाइव्ह" ने जिल्ह्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याची बातमी प्रकाशित केली होती. गेल्या ८ महिन्यांत जिल्ह्यात ८१ बलात्कार झाल्याची बातमी वाचून जिल्ह्यातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. त्या बातमीची चर्चा होत असतांनाच शेगाव मधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. शेगावला शिक्षणासाठी रूम करून राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामानेच बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणाची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून आरोपी नराधम मामाविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलगी खामगाव तालुक्यातील एका गावातील राहणारी आहे. तर आरोपी हा पिडीत मुलीचा मावसमामा म्हणजेच पिडीत मुलीच्या आईचा मावसभाऊ आहे. आरोपी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका गावचा राहणारा आहे. इथे पिडीत मुलीची ओळख जाहीर होऊ नये म्हणून आम्ही आरोपीचे नाव प्रकाशित करणे टाळत आहोत.
रूमवर येऊन केला बलात्कार...
पिडीत मुलगी तिच्या एका मैत्रिणीसह शेगावात रूम करून राहत होती. काही दिवसानंतर मुलीची मैत्रीण रूम सोडून गेल्याने पिडीत मुलगी एकटीच राहत होती. दरम्यान एकेदिवशी मुलीचा मामा तिच्या रूमवर आला, तिला त्याच्या मोबाईल मध्ये असलेले दोघांचे फोटो दाखवले. हे फोटो तू कधी काढले अशी विचारणा मुलीने मामाला केली असता मागच्या वेळी तुझ्या रूमवर आलो होतो तेव्हा काढले असे त्याने सांगितले. शिवाय ते फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.
त्यानंतर मी जसे म्हणतो तसे कर असे म्हणत तो तिच्या जवळ आला आणि नंतर तिच्या इच्छेविरुद्ध रूममध्ये तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने पुन्हा एक दोन वेळेस असेच कृत्य केले. घडला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला..दरम्यानच्या काळात मुलीचे मणक्याचे ऑपरेशन झाले, तिला चालता देखील येत नव्हते त्यामुळे आतापर्यंत तक्रार देण्यात आली नव्हती. मात्र १२ सप्टेंबरला पारस फाट्यावर पिडीत मुलीच्या आईला आरोपी भेटला, तुझ्या मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दे असे म्हणत मुलीच्या आईला मारहाण केली. मुलीच्या आईचा मोबाईल देखील आरोपीने हिसकावून नेला..दरम्यान आता याप्रकरणाची तक्रार शेगाव शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्याकडे देण्यात आला आहे.