कामावर ट्रॅक्टर लावले नाही म्हणून आला राग...कुऱ्हाड चालली! चौघांविरुद्ध गुन्हा; मोताळा तालुक्यातील घटना

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कामावर ट्रॅक्टर लावले नाही म्हणून एकावर कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मोताळा तालुक्यातील पिंपळखुटा येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात बोरखेडी पोलिस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पिंपळखुटा येथील गौरव संतोष लांडे हे विश्वगंगा नदीच्या बांधावर फिरण्यासाठी गेले असता, मलकापूर तालुक्यातील लासुरा येथील गणेश शांताराम पारस्कर हा ट्रॅक्टर घेऊन तेथे आला. त्याने मलकापूर येथील एका ठेकेदाराच्या कामावर आपले ट्रॅक्टर लावण्यास लांडे यांना सांगितले. मात्र, 'तू दारू पितोस, त्यामुळे ट्रॅक्टर मी कसे लावू?' असे म्हणत लांडे यांनी नकार दिला. यावरून पारस्करने शिवीगाळ केली, म्हणून लांडे हे घरी परतले. रात्री साडेआठच्या सुमारास गणेश पारस्कर, शांताराम पारस्कर, राजू आढाव आणि जितेंद्र पारस्कर हे चौघे लांडे यांच्या घरी आले. ट्रॅक्टरच्या वादातून त्यांनी गौरव लांडे यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर शांताराम पारस्कर याने गौरव लांडे यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले. तर अन्य दोघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लांडे यांच्या तक्रारीवरून बोरखेडी पोलिसात चौघांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.