निंबोळा येथे देवीदर्शनानंतर नदीपात्रात दुर्दैवी घटना; मायलेकींचा बुडून मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पुनम जामोदे, त्यांची मुलगी आर्ची तसेच संध्या सागर जामोदे (३४) व राधा गजानन जामोदे (५४) या चार महिला देवीच्या दर्शनासाठी निंबोळा येथे आल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर त्या मंदिराजवळील नदीपात्रात आंघोळीसाठी उतरल्या असताना पुनम व आर्ची यांचा पाय घसरला व दोघी पाण्यात बुडाल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात संध्या व राधा जामोदे याही पाण्यात अडकल्या.
घटनेदरम्यान त्या दोघींनी आरडाओरड केल्याने नदीकिनारी पूजा करत असलेले कृष्णा काळे (चांदुर बिस्वा) व संतोष पठाडे (रा. केदार) यांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत संध्या व राधा यांना बाहेर काढले. दोघींवर सध्या खासगी रुग्णालयात डॉ. वेतन जाधव यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, अनिल गांधी, अनिल बगाडे, पत्रकार अशोक रतनकार व नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, डॉक्टरांनी पुनम व आर्ची यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जामोदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.