जुन्या भांडणाचा वाद पेटला अन् चाकूहल्ल्यापर्यंत पोहोचला; तरुणाच्या पोटात वार, जालना रुग्णालयात मृत्यूशी झुंज! देऊळगाव राजाची घटना....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ वाजण्यापूर्वी माळीपुरा परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून सोमेश डांगे आणि केतन विजय तिडके यांच्यात वाद झाला. सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद पुढे हाणामारीपर्यंत पोहोचला.
याचदरम्यान केतन तिडके याने जवळील चाकूने सोमेश डांगे यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. चाकूचा वार झाल्याने सोमेश गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.जखमी सोमेश यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी प्रणयकांत श्रीराम डांगे (वय ६६) यांनी देऊळगाव राजा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी केतन विजय तिडके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, जुन्या वादातून झालेला हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, वादाला सुरुवात कशी झाली आणि हल्ल्यामागील अन्य काही कारणे आहेत का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.