मिरची पूड टाकून साडेपाच लाखांच्या बॅगेवर झडप घालण्याचा प्रयत्न; तरुणाने हिंमत दाखवून केला प्रतिकार, चोरट्याचा डाव फसला...

 
 खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शहरातील सनी पॅलेसजवळ एका धाडसी चोरीच्या प्रयत्नाची घटना घडली असून, दोन युवकांनी प्रसंगावधान राखत चोरट्याचा डाव हाणून पाडत लाखो रुपयांची बॅग वाचवली. ही घटना ११ जून रोजी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरात एका खासगी ठिकाणी नोकरी करणारा मंगलसिंग विजयसिंग पवार (वय २१) हा आपल्या सहकाऱ्यासोबत ५,६९,८६० रुपयांची रक्कम घेऊन जात असताना, स्थानिक सनी पॅलेस जवळ दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. चोरट्याने अचानक दोघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व त्यांच्या हातातील रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, डोळ्यांत जळजळ होऊनही या दोन्ही युवकांनी प्रसंगावधान राखत आणि धैर्य दाखवत चोरट्याला रोखले. त्याने चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे लक्षात येताच चोरटा तेथून दुचाकीवरून पसार झाला.
या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या घटनेबाबत मंगलसिंग पवार यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०९(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.