पेनटाकळीत अपघात की घातपात? १६ वर्षाच्या मुलीच्या अंगावर ट्रॅक्टर गेले; दिपक केदार म्हणतात, हा मनुवाद्यांचा बौद्वांवर अत्याचार; आज पेनटाकळी गावाला देणार भेट...
Mar 2, 2025, 12:55 IST
मेहकर(प्रसाद देशमुख: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथे काल,२ मार्चच्या सायंकाळी अपघात झाला. एका १६ वर्षीय मुलीच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने ती गंभीर जखमी असून तिच्यावर छत्रपती संभाजी नगरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..दरम्यान या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. हा मनूवाद्यांकडून बौद्ध समाजावर अत्याचार आहे, बौद्ध समाजाच्या घरात ट्रॅक्टर घालून एका चिमुरडीला चिरडले असे केदार यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे.आज दिपक केदार पेनटाकळी येथे भेट देणार आहेत..
पायल संतोष गवई (१६) असे जखमी मुलीचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पायल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मैत्रिणी सोबत किराणा दुकानात जात होती. त्यावेळी किराणा दुकानासमोर ट्रॅक्टर खाली आल्याने पायल गंभीर जखमी झाली. ट्रॅक्टर कासारखेड येथील असल्याचे सांगण्यात आले, ट्रॅक्टरचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा दावा एका गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे दिपक केदार यांनी मात्र हा बौद्ध समाजावरील अत्याचार असल्याचे म्हटले आहे. "पेनटाकळी येथे बौद्ध समाजाची ४० ते ५० घरे आहेत, ते ४० वर्षांपासून राहतात. त्यांना उठवण्यासाठी मनुवादी प्रयत्न करत आहेत. पत्र्याचे शेड टाकून समाज राहतोय त्याला भयभीत करण्यासाठी आणि कार्यवाही करण्याच्या उद्देशाने ही घटना घडवून आणली आहे का? "असा प्रश्न दीपक केदार यांनी फेसबुक पोस्ट मधून केला आहे. आजही आम्हाला माणूस म्हणून जगू दिले जात नाही. या आरोपीवर तात्काळ कार्यवाही करावी. प्रीत चिमुरडीला तात्काळ वाचवावे.. असे म्हणत आज पेनटाकळी येथे भेट देणार असल्याचे केदार यांनी म्हटले आहे.दरम्यान अद्याप या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल नाही..