विना नंबर टिप्पर आणि अवैध खनिज वाहतुकीवर वायुवेग पथकाची धडक कारवाई पाच महिन्यांत ३३९ टिप्परवर कारवाई; ३५ लाखांहून अधिक दंड वसूल

 
 बुलडाणा (जिमाका :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिल्ह्यात बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणारी विना नंबर प्लेट टिप्पर वाहने ही गंभीर समस्या बनली असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वायुवेग पथकाने जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत मोठी कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण ८३५ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ३३९ टिप्पर वाहनांवर कारवाई करून ३५ लाख ३१ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

महिन्यानुसार तपासणी व कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :
जानेवारी महिन्यात ११६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी ४० वाहनांवर कारवाई करत ४ लाख ९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये १८९ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ६३ वाहनांवर कारवाई करत ८ लाख ७१ हजार रुपये दंड आकारण्यात आला. मार्च महिन्यात १२७ वाहनांची तपासणी करून ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि ५ लाख ८७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल महिन्यात ९८ वाहनांची तपासणी करून २५ वाहनांवर कारवाई करत ५ लाख ६८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. मे महिन्यात सर्वाधिक ३०५ वाहनांची तपासणी झाली असून १७५ वाहनांवर कारवाई करत १० लाख ९६ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या पाच महिन्यांच्या कारवाईत एकूण ८३५ वाहनांची तपासणी झाली असून, ३३९ विना नंबर टिप्पर वाहनांवर कारवाई करत ३५ लाख ३१ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विना परवाना, विना नंबर प्लेट किंवा बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. परिवहन विभागाने यापुढेही अशा बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष ठेवून कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.