बुलढाण्यात कुंटणखाना चालवणाऱ्या ‘आंटी’वर कारवाई; दोन तरुणींची सुटका,चिखली रोडवर सुरू होत कुंटणखाना, एलसीबीच्या पथकाची धडक कारवाई

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सुसंस्कृत आणि शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्यात देहविक्रीचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखली रोड परिसरात एक ४२ वर्षीय महिलेकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कुंटनखाना चालविला जात असल्याची माहिती मिळताच जिल्हा गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत हा अड्डा उध्वस्त केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एलसीबी प्रमुख पीआय अंबुलकर यांच्या सूचनेनुसार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली. हाजी मलंग दर्ग्याच्या मागील भागात असलेल्या एका घरात ही महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
धाड टाकल्यानंतर पोलिसांनी दोन तरुणींसह एका ग्राहकाला रंगेहात पकडले. या दोघींपैकी एक तरुणी मध्य प्रदेशची तर दुसरी छत्तीसगडची असल्याचे समोर आले आहे.
२२ आणि २८ वर्षांच्या या दोन्ही पीडित तरुणींची ‘आंटी’च्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी महिला आणि ग्राहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चिखली रोड परिसरातील वाढत्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे येथील वातावरण बिघडत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.